Thursday, 27 February 2025

देशाच्या फाळणीच्या वेदना सोसलेल्या हशु आडवाणी यांचे समाज सेवेसाठी योगदान अतुलनीय

 देशाच्या फाळणीच्या वेदना सोसलेल्या हशु आडवाणी

यांचे समाज सेवेसाठी योगदान अतुलनीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. २६: साधी राहणी उच्च विचारसरणीचा अंगीकार करीत हशुजी अडवाणी  यांनी समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. त्यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. देशाची फाळणी झाल्यानंतर फाळणीच्या वेदना सोसत निर्वासित म्हणून नव्या भारतात आलेल्या हशुजी यांनी समाजसेवेसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

स्व. हशु अडवाणी जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चेंबूर येथील विवेकानंद शैक्षणिक संकुलाच्या मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करीत होते. व्यासपीठावर आमदार प्रसाद लाड, टिप्स कंपनीचे संचालक कुमार तौराणी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश मलकाणी, सचिव राजेश ग्यानी आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या फाळणीनंतर सिंधी समाज हा निर्वासित म्हणून भारतात आला. शिबिरांमधून सिंधी समाजाचे पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसनाच्या कामात स्व. हशुजी यांनी मोठी भूमिका बजावली. स्वतः घरदार पाकिस्तानात सोडून आलेल्या हशुजी  यांनी निर्वासितांचे अश्रू पुसण्याचे काम केले. निर्वासित म्हणून आलेल्या सिंधी समाजाने संघर्षातून विश्व निर्माण केले असून आज प्रत्येक क्षेत्रात समाज प्रगती करीत आहे.

            शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती केलेल्या हशुजी यांनी नगरसेवक पदापासून मंत्री पदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी राज्यमंत्री तसेच  राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले. अर्थमंत्री असताना त्यांनी राज्याचा अर्थसंकल्पही त्याकाळी सादर केला. त्यांना आणखी आयुष्य मिळाले असते, तर त्यांच्या कार्यामुळे झालेले अधिकचे परिवर्तन आपल्याला दिसले असते. त्यांनी स्थापन केलेली शैक्षणिक संस्था स्वामी विवेकानंद यांच्या नावाने आहे. यावरूनच त्यांच्या द्रष्टेपणा आणि भविष्य ओळखण्याची जाण लक्षात येते, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

            आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहोत. 1947 मध्ये जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था असलेला भारत साकारायचा आहे. ही जबाबदारी सर्व दृष्टीने बलशाली असलेल्या युवकांच्या खांद्यावर आहे. बलशाली युवक हा देशाला वेगाने पुढे नेत असतो, असे स्वामी विवेकानंद नेहमी सांगायचे.  यावरून भारताला महासत्ता  हा बलशाली युवकच बनवू शकतो. देशाला महासत्ता बनवून  स्वामी विवेकानंदांची  स्वप्नपूर्ती करायची आहे,  असे प्रतिपादनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

            हशु आडवाणी यांच्या जीवन कार्यावर आधारित कॉफी टेबल बुकचे विमोचनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वृंद, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००निलेश

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi