देशातील प्रत्येक नागरिक सहकार चळवळीशी जोडला जाणार
- केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह
मुंबई, दि. २४ : भारतातील सहकारी संस्था समृद्ध बनविण्यासाठी सहकार मंत्रालयाने महत्त्वाची पावले उचलली असून देशातील प्रत्येक नागरिक या माध्यमातून सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्ताकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री श्री.शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, केंद्रीय सचिव आशीष बुधानी, पंकज बन्सल, तसेच सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा तसेच संपूर्ण देशभरातून सहकार चळवळीशी संबंधित मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन, नव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम व उद्घाटन तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ दरम्यानच्या उपक्रमाचे वार्षिक कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले.
केंद्रीय सहकार मंत्री श्री.अमित शाह म्हणाले की, अम्ब्रेला संगटनामुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्षेत्राला फायदा होणार आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रीय आणि खासगी बँकेमध्ये सेवा मिळतात, अगदी त्याचप्रमाणे सहकारी बँकेद्वारे सेवा मिळतील. यासाठी सहकारी बँकेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत आहे. आज एक हजार ४६५ सहकारी अर्बन सहकारी बँका असून त्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत. आगामी काळात वित्तीय व्यवहार हा सहकारी बँकामार्फत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यासाठी नवीन पिढीने त्याबाबतचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात रोजगार निर्माण करावयाचा असेल तर सहकार क्षेत्राला नवीन आयाम देणे आवश्यक आहे. भारत सरकारने साखर उद्योगासाठी १० हजार करोड रूपयांचा इन्कम टॅक्स माफ केला आहे. काही वाद राहू नये यासाठी कायद्यात सुद्धा सुधारण केली असल्याचे त्यांनी सांगितले. दहा लाख टन साखर निर्यातीमुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. आगामी काळात सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचा संकल्प केला असल्याचेही श्री.शाह यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment