Wednesday, 15 January 2025

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी किंवा कुरवपूर या सारख्या ठिकाणी जाणे म्हणजे काही तरी पूर्वपुण्य

 श्रीक्षेत्र नृसिंहवाडी किंवा कुरवपूर या सारख्या ठिकाणी जाणे म्हणजे काही तरी पूर्वपुण्य पदरी असणे निश्चित आहे अन्यथा कृष्णामाईचे दर्शन घडणे शक्य नाही . थोरले महाराज कृष्णा लहरीत म्हणतात ,


पुरेष्टं दत्तं वा विहितमपि पूर्वं च सुकृतं l

स्वधीतं वा जप्तं श्रुतमपि यशो S जस्य हि तदा ll

भवददृष्टिः कृष्णे भवति भवभीहृत्खलु नृणां l

नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते ll १९ ll


हे कृष्णे !! पूर्वजन्मी जर काही याग केले असतील किंवा दाने दिली असतील अथवा वाटसरूंना विश्रांती घेण्यासाठी बगीचे ,पाणी पिण्यासाठी विहिरी वगैरे खणल्या असतील व यथाविधी क्षौत्रस्मार्त कर्मे केली असतील अथवा वेदाध्ययन केले असेल ,किंवा पुरश्चरणादि जप विधिपूर्वक केला असेल ,अथवा श्रीविष्णू किंवा श्रीमहादेव यांची लीला भक्तीने श्रवण केली असेल तरच संसारातून मुक्त करणारे तुझे दर्शन त्या मनुष्याला घडेल अन्यथा घडणार नाही . हे श्रीकृष्णे ! तुला माझा नमस्कार असो . हे दत्तमान्ये शमिततृष्णे ! तुझा जयजयकार असो ll १९ ll


या ठिकाणी थोरल्या महाराजांनी केवळ दर्शनाचा उल्लेख केला आहे ,केवळ दर्शनाकरिता हि पूर्वपुण्याईची पात्रता असली तर या कृष्णामाईत असलेल्या तीर्थात स्नान ,तीरावरील दत्त महाराजांच्या क्षेत्रात यजन- पूजन आणि सर्वात वरची पायरी म्हणजे तीरस्थ या नात्याने जन्माला येणे यासाठी किती पूर्वपुण्याई हवी याचा विचार करावा .


तीरस्थ म्हणजे या काठी निवास असलेल्या कुळात जन्म . आता तीरस्थांमध्ये देखील काय पात्रता आहेत ?? ,केवळ तीरावर म्हणजे कृष्णामाई काठी जन्म ,त्यानंतर या तीरावरील दत्त महाराजांच्या क्षेत्रात जन्म त्याही पुढे नृसिंहवाडीसारख्या दत्त महाराजांच्या क्षेत्रात पुजारी कुलोत्पन्न आणि त्यातही वेदविद्यासंपन्न होऊन दत्त महाराजांची विधिवत सेवा घडून येणं .


आता थोरल्या महाराजांना जर कृष्णामाईचे दर्शन जर एव्हडे दुर्लभ आणि पुण्यकारक वाटत असेल तर या पुढील सर्व पायऱ्या चढून नृसिंहवाडीसारख्या क्षेत्री पुजारी कुलोत्पन्न होऊन दत्त महाराजांची सेवा हातून घडणे म्हणजे किती पूर्व पुण्याई हवी याचा विचार करावा . 

शमिततृष्णे म्हणजे विषयरूपी तृष्णेचे शमन हा अर्थ असला तरी महाराजांना काय अर्थ अपेक्षित आहे ?? --- तृष्णा म्हणजे तहान , देहाचा विचार करता हि तहान पाणी पिऊन भागली कि काही वेळाने पुन्हा तहान लागते . इथे महाराज म्हणतात या विषयरूपी तृष्णेचे शमन कर म्हणजे कायमस्वरुपी हि विषयरूपी तहान नष्ट कर . विषयरूपी तहान कायम स्वरूपी शमली कि दत्त महाराजांच्या कृपेस पात्र होऊ .🙏🏻


 🪷श्रीगुरुदेव दत्त !!! ---🪷


 अभय आचार्य 💫🙏🏻🚩


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi