'म्हाडा'च्या माध्यमातून दोन वर्षात एक लाख घरे उभारणार
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
म्हाडा पुणे मंडळातर्फे ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात
मुंबई, दि. २९ :- सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३,६६२ सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली. यावेळी श्री. शिंदे बोलत होते.
विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारले जाणार आहेत. म्हाडा पुणे मंडळाच्या ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अनामत रकमेसह ७१,६४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणावर (म्हाडा) दाखवलेला हा विश्वास आहे. अर्जदारांचा हाच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी घरांच्या गुणवत्ता व सोडतीच्या पारदर्शकतेमध्ये कुठेही तडजोड न करता सोडतीतील विजेत्या अर्जदारांना तात्काळ सदनिकांचा ताबा देण्यात यावा. महाराष्ट्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे.
No comments:
Post a Comment