दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर देणार
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
सार्वजनिक आरोग्य विभागाचा घेतला आढावा
मुंबई, दि. १ : रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून राज्यातील जनतेचे आरोग्य जपण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, औषधे आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची त्रयस्थ पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देशही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी विभागाचा आढावा घेतला. बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव नवीन सोना, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, संचालक स्वप्निल लाळे यांच्यासह आरोग्य विभागातील विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment