विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांची भूमिका समन्यायी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभेच्या सभागृहात प्रत्येक घटकाला समान न्याय देतानाच सामजिक समतोल राखत समन्यायी भूमिका घेवून कामकाजाची विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची हातोटी आहे. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचे नाव विधीमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबदल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे अभिनंदनपर प्रस्तावावर बोलत होते. ॲड.नार्वेकर यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज कौतुकास्पद आहे. मागील अडीच वर्षात त्यांनी चांगले काम केले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अडीच वर्षात त्यांनी सखोल अभ्यास करून राज्याच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय दिले. त्यांनी अध्यक्षपदाची उंची अधिक वाढवली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काढले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर देशाचा, राज्याचा कारभार चालतो. राज्यात आता विकासाचे व प्रगतीचे नवे पर्व सुरु झाले आहे. अध्यक्षांच्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास नक्कीच होईल. या सभागृहाचे पावित्र्य राखत राज्याला विकासाच्या महामार्गावर नेण्यास सर्वांनी प्रयत्न करूया असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment