Monday, 16 December 2024

उस्ताद झाकीर हुसेन यांनी जाणकार व जनसामान्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले

 उस्ताद झाकीर हुसेन यांनी जाणकार व जनसामान्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले

 - राज्यपाल सी पी राधाकृष्णन

 

मुंबई, दि. १ : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विश्वविख्यात तबला नवाज पद्मविभूषण  उस्ताद  झाकीर  हुसेन  यांच्या  निधनाबद्दल  तीव्र  दुःख  व्यक्त  केले आहे. 

उस्ताद झाकीर हुसेन यांचे अमेरिकेत निधन झाल्याचे वृत्त भारतीय संगीत विश्वाकरिता अत्यंत धक्कादायक आहे.

उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र व सच्छिष्य असलेल्या झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेले.

प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेमुळे झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकार आणि जनसामान्य श्रोते अशा दोघांनाही आपल्या अभूतपूर्व तबलावादनाने मंत्रमुग्ध केले. त्याचे  तबला  वादन  ऐकून  लाखो  युवक  युवती  तबला  वादनाकडे  वळले.

भारतीय शास्त्रीय संगीत घराघरात पोहोचवून एकल तबला वादनाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. साथ संगीतकार म्हणून आपला अमीट ठसा उमटवताना त्यांनी तीन पिढ्यांच्या गायक संगीतकारांसोबत तबलावादन केले.

त्यांच्या निधनामुळे भारताने-विशेषतः महाराष्ट्राने आपला अत्यंत लाडका सुपुत्र व संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा गमावला आहे. झाकीर हुसेन यांचे संगीत चिरंतन राहील व संगीतकारांच्या पिढ्यांना नवनिर्मितीसाठी प्रेरित करील. या दुःखद प्रसंगी मी दिवंगत उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय व लाखो संगीत चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या  शोकसंदेशात  म्हटले आहे. 

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi