Sunday, 1 December 2024

*अमृतधारा - ४९*

 💧श्रीराम समर्थ💧


   *अमृतधारा - ४९*


पुष्कळदा आपण जे करतो ते कशाकरता करतो कळत नाही. 


आपण नोकरीकरता नोकरी करत नाही तर पैशाकरता करतो. आपण गाडीत कशाकरता बसलो ते माहीत नसले, तर मग सगळाच  घोटाळा होतो. मुक्काम माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व जीवनाचे कष्ट कशाकरता करायचे ते माहिती पाहिजे. 


माणूस प्रपंचाकरता श्रम करतो, त्यासाठी देश सोडतो, मानापमान पण सोसतो, हे सर्व सुख समाधान मिळण्याकरता तो करतो.


मग विचार करू की इतके वर्षे कष्ट केले तर सुख किती मिळाले? 


प्रपंचात समाधान मिळाले नाही तर तो फुकट गेला. म्हणून माणसाने आपले ध्येय ठरवावे.


आनंद वेगळी अशी वस्तू नाही, तो ज्याच्याजवळ असतो तो भगवंत मिळवावा.


भगवंताच्या विस्मरणात इतर सर्व गोष्टी मिळतील, पण समाधान मिळणार नाही.


भगवंताचे स्मरण सुटले तर गाडीबरोबर ये-जा करण्यासारखे जन्म मरण घडते (ड्रायव्हर व गार्ड रोज गाडी बरोबर काशीला ये-जा करतात पण त्यांना काही काशीयात्रा घडत नाही).


समाधान वैभवाने वा श्रीमंतीने येत नाही. ते गरीबी व झोपडीतही असेल. ते मिळाले नाही तर सर्व कष्ट फुकट गेले. समाधान मिळाले तर कष्टाचे काही वाटणार नाही.


समाधान मिळण्याकरता काय करावे हे संतांनी सांगितले. भगवंत साधावा, त्याचे प्रेम साधावे. आपण भगवंताचे होऊन राहाणे यात खरे भूषण आहे. 


*ज्याच्या प्रपंचात भगवंत व त्याचे स्मरण आहे तेथेच समाधान असते.*


*आशीर्वाद.*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi