समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे.
राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली. तसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे श्री पवार यांनी सांगितले. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने पुढील काळातही योजना अशीच चालू राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यशासनाने शेतकऱ्यांसाठी विज बिल माफी योजना आणलेली असून या अंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे.शासन सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे असल्याने त्यांच्या हितासाठी अधिक लक्ष दिले जात आहे. हे शासन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक भाषणात महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, आजचा दिवस हा महिला व बालविकास विभाग म्हणून अभिमानाचा दिवस आहे. नवरात्रीत देवींची पूजा केली जाते. येथे उपस्थित सर्व महिला देवींच्या लेकी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या लाडक्या भावांनी राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक बळ दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. प्रत्येक स्त्री ही आपल्या परिवारासाठी संसारासाठी जगत असते, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आता महाराष्ट्रातील स्त्री ही स्वतःसाठी जगणार आहे. ही योजना भविष्यात निरंतर चालावी यासाठी शासनाने आर्थिक नियोजनासह तरतूद केली आहे.
लाडक्या बहिणींना विविध लाभांचे वाटप
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना एकूण 17 हजार 200 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत, त्याचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात 10 महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पिंक ई- रिक्षा, लेक लाडकी योजना, मोफत गॅस सिलेंडर यासह अन्य योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर दोन्ही बाजूच्या उपस्थित शेकडो महिलांनी दोघांना राख्या बांधल्या व ही योजना अशीच निरंतर चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रमाईमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
0000
No comments:
Post a Comment