समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध
- उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने पुढील काळातही योजना अशीच चालू राहील. शेतकऱ्यांसाठी विज बिल माफी योजना आणलेली असून या अंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राष्ट्र निर्मितीमध्ये महिलांचे स्थान व योगदान खूप मोठे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली. तसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे श्री पवार यांनी सांगितले.
राज्य शासनाने कांदा निर्यात बंदी उठवली तसेच तांदूळ निर्यात बंदीही उठवली आहे. दुधाला सप्टेंबर 2024 मध्ये पाच रुपये प्रति लिटर वाढ देण्यात आलेली होती त्यात 7 रूपये वाढ करून प्रतिलिटर 35 रुपये दुधाचा भाव ठरवून देण्यात आलेला आहे. शासन सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे असल्याने त्यांच्या हितासाठी अधिक लक्ष दिले जात आहे. पोलीस पाटील व कोतवाल यांचे मानधन दुप्पट करण्यात आले. आशा सेविका, गटप्रवर्तक व अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली. सरपंच, उपसरपंचाचे मानधनात ही दुप्पट वाढ करण्यात आली. अशा प्रकारे हे शासन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन श्री. पवार यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment