*श्री दत्त मंदिर*
मुरूड, जि.रायगड
संकलन - सुधीर लिमये पेण
मुरुड गावचे उत्तरेकडे टेकडीवर समुद्रसपाटीपासून सुमारे ३५० ते ४०० मीटर उंचीवर १०६ गुंठे जमिनीवर हे श्री. दत्त गुरूंचे मंदिर आहे. ते अतिशय सुंदर व अप्रतिम ठिकाण आहे. हे मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक लहान मोठ्या व्यक्तींचे योगदान आहे. १८ व्या शतकाच्या मध्यास ब्रम्हेंद्रस्वामी धावडशिकर या सिद्धी प्राप्त साधूने या टेकडीच्या माथ्यावर सपाट मैदानात उंबराच्या झाडापाशी श्री दत्तगुरूंच्या पवित्र पादुकांची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका आहे.
२० व्या शतकाच्या प्रारंभिक १९०६ ते १९०७ च्या सुमारास जंजिरा संस्थानाच्या सरन्यायाधीश पदी असलेल्या राजाध्यक्ष यांनी स्वखर्चाने छोटीशी दत्तगुरूंची मूर्ती आणून त्या मूर्तीची त्या ठिकाणी विधिवत प्रतिष्ठापना केली. सोबत मूर्ती पुढे त्यापूर्वी ब्रम्हेंद्रस्वामीनी स्थापित केलेल्या श्री दत्तगुरूंच्या पादुका स्थापित केल्या त्या आजतागायत आहेत.
या ठिकाणी प्रशस्त मंदिर बांधले जावे अशी भक्तांची इच्छा होती. त्याप्रमाणे १९२६-२७ मध्ये दत्त मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. यावेळी मंदिरातील सभागृह कौलारू जे होते ते आज देखील जपून ठेवण्यात आले आहे. सभागृहात छताला लाकडी सिलिंग होते. त्यावर दत्त मंदिरातून दिसणा-या आजूबाजूच्या परिसराची चित्रे कोरण्यात आली होती. त्यावेळी जिर्णोद्धाराचे कार्यात कै. चिंतामणी अनंत जोशी यांचा पुढाकार होता. कालांतराने अलीकडे पुन्हा सन १९९७ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. सदरचा जिर्णोद्धार चौलकर कुटुंबाने पुढाकार घेऊन केला असून. दत्तगुरूंच्या मूर्तीसाठी लाकडी देव्हारा करण्याचे काम देखील चौलकर कुटुंबाने खर्च करून श्री नयन जमादार यांच्या कामगिरीतून पार पाडले आहे. श्री नरेश खोत व विलास खोत या बंधूंनी आगरदांडा रस्त्यापासून थेट मंदिरापर्यंत दगड व मुरूम यांच्या साह्याने रस्ता तयार करून त्यावर डांबरीकरण केले आहे.
सदरचे मंदिर टेकडीवर असल्याने तेथून मुरुड शहरातील निसर्गरम्य अशी नारळी पोकळींच्या हिरवागार भागांचे दर्शन होते.

No comments:
Post a Comment