Thursday, 15 August 2024

पर्यावरणपूरक महाराष्ट्र करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे

 पर्यावरणपूरक महाराष्ट्र करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे

                                                                    -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


            मुंबईदि. 15 :- ग्लोबल वार्मिंगमुळे जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी
 पर्यावरण रक्षण महत्वाचे आहे. आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्याला पर्यावरण पूरक महाराष्ट्र करावयाचा आहे, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            सेव्ह मुंबई (Save Mumbai) कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा व द ॲड्रेस सोसायटीच्या वतीने अडीच एकर क्षेत्रफळावरील "मानव निर्मित जंगलाचे लोकार्पण"  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते  बोलत होते. कार्यक्रमास कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राम कदम, आमदार दिलीप लांडे यांच्यासह  ॲड्रेस सोसायटीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेस्वातंत्र्य दिनी घाटकोपर येथील  ॲड्रेस हाऊसिंग सोसायटीने त्यांच्या सोसायटीच्या  परिसरात अर्बन फॉरेस्ट निर्माण करून पर्यावरण रक्षणात केलेले काम अतुलनीय आहे. या सोसायटीचा आदर्श मुंबईतील अन्य सोसायटीनी घ्यावा. मुंबईत ज्या सोसायटी त्यांच्या परिसरात अर्बन फॉरेस्ट हा उपक्रम राबवतील त्यांना  महापालिकेच्या सोसायटी करामध्ये सवलत देण्याबाबत विचार केला जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेपर्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “एक पेड़ माँ के नाम अभियान सुरू केले आहे.  या अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात वृक्ष लागवडीची जनचळवळ सुरू करूया. अर्बन फॉरेस्ट ऑक्सीजन पार्क असल्याने जिथे जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करण्यात सहभाग घ्यावा. यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. बृहन्मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएनेही त्यांच्या रिकाम्या असणाऱ्या जागेत अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात पुढाकार घ्यावाअसे आवाहनही त्यांनी केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. प्रदूषणमुक्त  राज्य करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. राज्यात बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत असून जवळपास 21 लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवले असल्याचे ते म्हणाले.

            आपले राज्य विकासाच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असून विकासाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरू ठेवायची असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi