सायबर गुन्हेमुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर
- पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर
बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले की, सायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलीस आपल्या सदैव पाठिशी आहे. मुंबई पोलिस सायबर सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी समाजमाध्यमे वापरताना अनोळखी व्यक्तींचे कॉल, फ्रेंड रिक्वेस्ट यांना प्रतिसाद देवू नये. फसवणुकीची घटना घडल्यास आपल्या पालकांना कल्पना द्यावी. तसेच कुठलीही शंका न बाळगता पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकाची सुद्धा मदत घ्यावी. व्हॉट नाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेली मोहीम प्रशंसनीय आहे. युवकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सायबर विषयक जनजागृती करावी, असे आवाहन करून मुंबई पोलिस आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, मोबाईल हे केवळ संपर्काचे साधन राहिलेले नसून आपली ओळख बनले आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती संकलित असते. त्यामुळे मोबाईलला हॅक करून, त्यामधील माहिती चोरून आपली फसवणूक होवू शकते. देशात नवीन कायदे लागू झाले असून याबाबत पोलिसांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. हे कायदे पीडितांना नक्कीच न्याय देणारे आहेत. व्हॉट नाऊ संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच समाजात सायबर सुरक्षा विषयक साक्षरता निर्माण करणारा ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांनी सायबर सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगत व्हॉट नाऊ संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. 'व्हॉट नाऊ'च्या संस्थापक निती गोयल व सहसंस्थापक निवेदिता श्रेयांश यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. ऑनलाईन फसवणूक झाल्यास मदत करणारा हा उपक्रम युवकांना निश्चितच सहाय्यभूत ठरणारा असून युवकांमार्फत युवकांसाठी सुरू झालेली ही चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment