Thursday, 4 July 2024

सूतगिरण्यांना अनुदान तर यंत्रमाग धारकांना वीजदर सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय

 सूतगिरण्यांना अनुदान तर यंत्रमाग धारकांना

वीजदर सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय


- वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. 4 : राज्यातील सूतगिरण्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून या सूतगिरण्यांना नवसंजीवनी देण्यासाठी सहकारी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 3 प्रमाणे 3 वर्षांकरीता वीज अनुदान व खासगी सूतगिरण्यांना प्रती युनिट रुपये 2 प्रमाणे वीज अनुदान देण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.


            यंत्रमाग धारकांच्या अडचणी संदर्भात सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            त्यावर बोलतांना वस्त्रोद्योग मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. यंत्रमाग धारकांना २७ एचपी पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट १ रुपये अतिरिक्त वीजदर सवलत व २७ एचपी पेक्षा जास्त परंतु २०१ पेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट ०.७५ अतिरिक्त वीजदर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


            अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिन्ले मिल्स हे ग्रामीण भागातील उद्योग असून अनेक कामगार येथे काम करत आहेत. कोविड काळातील अडचणीमुळे मिल बंद झाल्याने अनेकांच्या रोजगारांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ही मिल सुरू करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन ही मिल सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


            या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री बच्चू कडू, अनिल देशमुख, नाना पटोले, रवी राणा, श्रीमती यामिनी जाधव, विजय देशमुख यांनी चर्चेत सहभाग घेतला.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi