गोंडपिंपरी ग्रामीण रुग्णालयासाठी
शासकीय जागा देण्याचा प्रयत्न
- आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
मुंबई, दि. 1 : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत सार्वजनिक वापरास योग्य नसल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तेथील सेवा स्थलांतरित करण्यात आली. तसेच. याठिकाणी इतर शासकीय जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु असून ती जागा उपलब्ध झाल्यास याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधली जाईल अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य सुभाष धोटे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, रुग्णालयाची इमारत वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर यांनी स्ट्रक्चरल ऑडिट नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. सद्यस्थिती पाहता या इमारतीचे नूतनीकरण आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. बाह्यरुग्ण विभाग हा वैद्यकीय अधिकारी यांचे निवासस्थानामध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच, आंतररुग्ण विभाग हा रुग्णालय परिसरामध्ये नवीन बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment