म्हाडा अभ्युदयनगर येथील पुनर्विकास प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेणार
- गृहनिर्माणमंत्री अतुल सावे
मुंबई, दि. 1 : म्हाडा वसाहतीमधील अभ्युदयनगर (काळाचौकी) येथील पुनर्विकास प्रकल्पाबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य अजय चौधरी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना विधानससभेत मांडली होती.त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सावे बोलत होते.
मंत्री सावे म्हणाले, अभ्युदयनगर (काळाचौकी) या म्हाडा वसाहतीचा पायाभूत सुविधांसह समुह पुनर्विकास व योग्य नियोजन करणे शक्य व्हावे, तसेच म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास करताना चांगल्या दर्जाच्या इमारती व सोयीसुविधा उपलब्ध करून देता यावे यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. वसाहतीचा एकत्रित पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने म्हाडाकडून प्राप्त प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. लवकरच बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.
या लक्षवेधी सूचनेमध्ये सदस्य सर्वश्री सुनील राणे, बच्चू कडू, योगेश सागर, सुनील प्रभू, सुहास कांदे यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.
००००
No comments:
Post a Comment