वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये
विषशोध यंत्रणेच्या पडताळणीसाठी समिती
- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 4 : शासकीय रुग्णालयांमध्ये विषबाधा किंवा विषाशी संबंधित रुग्णांचे रक्त तपासणी करण्यात येते. रुग्णाच्या ‘क्लिनिकल’ इतिहासावरून विषारी औषधाचा शोध घेण्यात येतो. त्यानंतर उपचार करण्यात येतात. या रुग्णालयांमध्ये विषाचा प्रकार शोधणारी ‘टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग’ यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत समिती नियुक्त करून यंत्रणेची पडताळणी करण्यात येईल. यंत्रणेची विश्वासार्हता तपासून सर्व रूग्णालयांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य किशोर जोरगेवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नारायण कुचे, कैलास गोरंट्याल, अमित देशमुख, सुलभा खोडके, प्रकाश आबिटकर यांनी भाग घेतला.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोल्हापूरमधील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सर्व व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये खासगी रुग्णालयात यकृत बदलाचा प्रस्ताव आला असल्यास त्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल. लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील फर्निचर व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी वाद होता, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून जागा निश्चित करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णलय परिसरातील जागेवर वैद्यकीय महाविद्यालय करण्याची बाब तपासून घेवून निर्णय घेण्यात येईल. याबाबत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयात या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करुन रुग्णालयाचे बांधकामही सुरू करण्यात येईल. राज्यातील मोठ्या शहरातील शासकीय रूग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment