मनोज जरांगे –पाटील यांच्या वाहन ताफ्याच्या
सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस नियुक्त
- मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 4 : मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक आंतरवाली येथे गेले. तेथील शिवारात पाहणी केली असता पोलीस पथकास ड्रोन आढळून आले नाहीत. तथापि, याबाबत संशयास्पद वाटणाऱ्या बाबींची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र पथके पोलीस अधीक्षकांनी तयार केली असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.
मंगळवारी 3 जुलै रोजी विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यासंदर्भात सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्राप्त करून त्याबाबत सभागृहास अवगत करण्यात येईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी सभागृहास आश्वस्त केले होते. त्यानुसार आज विधानसभेत सदर प्रकरणी मंत्री श्री. देसाई यांनी माहिती दिली.
No comments:
Post a Comment