रोज करा योग, नियमित रहा निरोग
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई, दि. 21 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यातूनच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोग राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई पोर्ट आणि इतर केंद्रीय संस्था, योग संस्थातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगा कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पवन बायेकर, जी.बी. मोरे यांच्यासह होमगार्ड, एनसीसी कॅडेट, अधिकारी, कर्मचारी, योग संस्थांचे योग गुरू उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज सर्व जगभर योगदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व ओळखून संपूर्ण जगभर योगाला ओळख निर्माण करून दिली. तर योगगुरू रामदेव बाबा यांनी योग जगभर पोहोचविण्याचे काम केले. योगवर आपली प्राचीन संस्कृती आधारित असून त्यांनी योगाला घराघरात पोहोचविले. उत्तम आरोग्याचा नवा मंत्र योग आणि आयुर्वेद जडी-बुटी आहे. पंतप्रधान श्री. मोदी कधीच योग विसरत नाहीत, म्हणून ते तंदुरूस्त आहेत. भारताला पुढे नेण्यात ते अग्रेसर असून महाराष्ट्र त्यांच्या विकास कामाला नेहमी साथ देत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेट वे ऑफ इंडिया येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम होत आहे, हा आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये योगासनाला आंतरराष्ट्रीय महत्व मिळवून दिले. सध्या जगातील १५० हून अधिक देशात योग साधना केली जात आहे. प्राचीन उपचार पद्धती जी आरोग्यदायी जीवनपद्धतीला सहाय्य करते, ही पद्धती जगाने स्वीकारली. आजच्या जीवनपद्धतीला योग साधना उपयुक्त असून सर्वांनी नियमित योग साधना करण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.
००००
No comments:
Post a Comment