Tuesday, 4 June 2024

आजोबा दिवस माझिया फुलायचं,झोपल्या वाचून झुलयाचे

 आजोबा


   आज नर्सरीची सगळी मुलं ओळीत उभी राहिली बाईंनी प्रार्थना म्हणून घेतली ..मग काही श्लोकांचे पाठांतर झाले ...त्यानंतर बाई प्रश्न विचारायच्या मुले उत्तर द्यायची अशा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नोत्तराचा कार्यक्रमही झाला..... मुलांचा जोश जबरदस्त होता कारण सगळ्या प्रश्नांची उत्तर तोंडपाठ होती ....शक्तीची देवता असं विचारलं की लगेच उत्तर यायचं.... राम भक्त हनुमान !गोड गोड दूध कोण देते की उत्तर लगेच ....आमची गोमती गाय असा प्रश्नोत्तरांचा सामना व्हायचा... मग खेळायला खेळणी दिली जायची गटागटाने खेळणी खेळून झाली की मग डबा खाण्याची सुट्टी ......मग सगळ्यांनी गोल बसायचं डबा खायचा त्यापूर्वी वदनी कवल घेता म्हणायचं नमस्कार करायचा आणि एक हात मागे करून आपले डब्यातील जेवण ताटलीत काढून घ्यावयाचे अर्थात याला आमच्या सेविका मदत करीत असत आणि मग मुलं डबा खायची. मग बाई एकेकाला विचारायच्या... अवनी तूझ्या डब्यात काय ?....मग अवनी म्हणायची... तूप साखरपोळी सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून म्हणायचं.... तूप साखर ..तूप साखर.. तूप साखर . अशा मजेत जेवण व्हायचं मुलं ओळीने हात धुवायला जायची.. जेवणापूर्वी अशीच ओळ करून हात धुवत असत मग टॉवेलला हात स्वच्छ पुसायचे . तोपर्यंत मावशी झाडून घ्यायच्या आणि खोली पुसायच्या तो पर्यंत मुलं बाहेरच्या झोक्यावर घसरगुंडीवर मजेत खेळायची मग पुन्हा वर्ग भरायचा! आज तसाच वर्ग भरला बाई गाणी म्हणत होत्या ...मुले फेर धरून बाईंभोवती नाचत होती. पोस्टमन चे गाणे... फळांचे गाणे ..फुलांचे गाणे अशी विविध गाणी म्हणून मुले नाचत होती ..त्यापेक्षा आवडीचे गाणे म्हणजे आजोबांचे गाणे सगळी मुलं उत्साहातआजोबांचे गाणे म्हणायची.. "आजोबांच्या चष्म्यावर फुगे दोन दोन दिसत नाही त्या त्यांना आले कोण कोण ?"आणि मग आजोबा कोणाचे.. आजोबा कोणाचे ..माझे माझे माझे माझे ......असा त्याचा शेवट असे हे गाणं सुरू झालं आणि इतका वेळ दंगा करणारा संदीप ओळीतून बाहेर पडून एका कोपऱ्यात गेला आणि गुडघ्यात पाय खूप खूपसून रडायला लागला बाईना वाटल याला कुठेतरी लागलं मग बाईनी त्याला जरा समजूत घातली... जवळ घेतलं.. डोक्यावरून हात फिरवला.. पाणी पाजलं आणि जरा हसवले पण तरी स्वारी जरा हिरमुसलेलीच होती. मुळात आमच्या या बालवाडीच्या बाई  होत्या त्या अतिशय मातृ हृदयी होत्या.. त्यांचा चेहरा एवढा सात्विक प्रत्येक मुलाला आपली आईच वाटावी आणि आईच्या मायेने सगळ्यांना करायचं कोणी जेवत नसेल तर त्याला मांडीवर घेऊन जेवायला घालायच्या कोणी रडायला लागला तर त्याला मांडीवर घेऊन बसायच्या बाईंचा मुलांना फार  लळा लागला होता सुट्टीच्या दिवशी सुद्धा मुले बाईंकडे  जाण्याचा हट्ट करीत असत. एकूण वर्गातील सगळी मुलं आणि बाई यांचा फार सुंदर नातं होतं संदीप तरी बाईंना चिकटलेला असायचा या सगळ्या मुलांची गंमत म्हणजे सगळं घरातलं सांगायचं ...बाबा असं म्हणाले आई असं म्हणाली आई-बाबांचे भांडण झालं आजी  आणि आई  मध्ये वाद झाला घरी पाहुणे आले आईन आज लाडू करून डब्यात ठेवलेत अशा सगळ्या  बातम्या मुलं बाईंना सांगत असत त्यामुळे  घरातल्या व्यक्तिमत्त्वाची बाईंना ओळख होती!


   दुसऱ्या दिवशी शाळा भरली पुन्हा तोच कार्यक्रम आजोबांचं गाणं झालं आणि संदीप पुन्हा कोपऱ्यात जाऊन रडायला लागला दोन दिवस तीन दिवस हाच प्रकार बाईंनी संदीपला जवळ घेतलं पण संदीप बोलायला तयार नाही नुसती मुसमुस मग त्याच्या आईला ही सांगितलं संदीप बोलत नाहीये रडतो काय झाले त्या म्हणाल्या असं का बघते हं... पण हे रोज दोन-चार दिवस चालल होत मग बाईंना जरा शंका यायला लागली आणि संदीपला घ्यायला येणारे आजोबाही चार दिवस येत नव्हते मग मात्र बाईंनी ही गोष्ट माझ्या कानावर घातली की आजोबांचं गाणं सुरू झालं की संदीप रडतो मी म्हणाले ठीक आहे मी जरा लवकर शाळेत गेले शाळा सुटायच्या वेळेला त्याची आई आली त्यांना जरा थांबून घेतलं म्हणलं, जरा बोलायचे संदीपची आई थोडं थांबा. आज त्या थांबल्या इतर पालक गेल्यानंतर मी आणि त्या हॉलमध्ये बसून बोलत होतो बाई पण काम आटपून आल्या मला वाटतं त्या पालकांना साधारण कल्पना असावी की आम्ही काय विचारणार आहोत त्या म्हणाल्या ...बोला बाई काय काम आहे..मी म्हणाले मला दोन प्रश्न आहेत .. चार दिवस झाले संदीपचे आजोबा त्याला घ्यायला येत नाहीत बरं नाहीये का त्यांना? नाही नाही तसं काही नाहीये बरे आहेत ते.. मग माझा दुसरा प्रश्न मग असं काय झालंय घरामध्ये की आजोबांचं गाणं आम्ही जेव्हा वर्गात घेतो तेव्हा संदीप पायात डोकं खूपसून रडतो?.. मी म्हणलं ताई गेले चार दिवस हे चाललेल आहे काय झाले तुमच्या घरात अगदी मोकळेपणाने सांगा अहो त्या मुलाच्या मनावर परिणाम होतोय त्याचा ...आणि मग मात्र त्या रडायला लागल्या मी त्यांना पाणी दिलं शांत केलं आणि म्हणल अगदी मोकळेपणाने बोला मी तुमच्या आईसारखे आहे त्या म्हणाल्या काय सांगू बाई गेल्या आठ दिवसापासून आजी आजोबा वेगळे घर करून राहतात ते घरात नाहीत त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण बिघडलय संदीप तरी त्यांचा खूप लाडका नातू संदीपच आणि आजोबांचं इतकं सुंदर नातं आहे की संदीप सतत त्यांच्या भोवतीच असतो ते त्याला बाहेर घेऊन जातात फिरवून आणतात त्याच्याबरोबर खेळतात गप्पा मारतात त्याचं सगळं ऐकून घेतात खूप छान आहे सगळं.. पण आमच्याशी मात्र त्यांचा पटत नाही अतिशय किरकोळ कारणावरून वाद होतात खूप गोष्टी मी समजून घेते माझ्या नवऱ्याला कामामुळे वेळ नसतो ते घरात वेळ देऊ शकत नाहीत मग त्यांचं सगळं ऐकून घ्यायला मीच असते.. माझाही कधीतरी तोल जातो माझ्या हातून दूध ऊतू  गेलं.. सासूबाई बोलल्या लक्ष नसते तुझं.. मी म्हणाले अहो सकाळी गडबड असते होते एखाद्या वेळेला तुम्ही बघायचे एखाद्या वेळेला ..झालं एवढ्या शब्दाने घरात रणक्रंदन.. आजी आजोबांमध्ये काय झालं माहित नाही त्यांनी यांना सरळ सांगून टाकला मी उद्यापासून वेगळे राहतो आणि वेगळी खोली करून राहायला लागले घराकडे अजिबात फिरकेनात या वयात त्यांना स्वयंपाक पाणी होते का? म्हणजे ही एक आणखीन काळजीच ना माझ्या नवऱ्याला मी माफी मागितली तरी ऐकायला तयार नाहीत म्हणाले चुकलं माझं मी नको होतं म्हणायला . ...पण नाही ..हे सगळे आपल्या मोठ्या माणसात चालत पण या लेकरांवर त्याचा परिणाम होतो ना ..चार दिवस झाले संदीप नीट जेवत नाही माझ्याशी बोलत नाही शांत झोपत नाही एकटाच रडत बसतो माझ्याही लक्षात आले हे पण काय कराव ते ऐकायला तयार नाहीत....... प्रश्न म्हणाला तर गंभीर होता   गैरसमज काढून टाकले तर सहज सुटणार आहे..आता याबाबत आपण काय सांगणार मी त्यांना एवढेच म्हणाले आपलेच आई-वडील आहेत असं समजून त्यांच्याशी वागा अगदी गृहीत धरा कि ते हट्टी हेकेकोर आहेत आपणच त्यांना समजून घ्यायला पाहिजे म्हातारपण हे बालपण असतं दुसरं तुमच्या घरात संदीप एकटा मुलगा नाहीये ही दोन्ही मुलं आहेत असं समजून वागाल तर हे प्रश्न सहजी सुटणार आहेत ..त्या फक्त हो म्हणाल्या आणि संदीपला घेऊन गेल्या दोन दिवसांनी संदीप ला भेटायला आजोबा शाळेत आले येताना खाऊ घेऊन आले होते मी आजोबांना आत बोलवलं म्हणाले बसा. मी म्हणलं जरा याच विषयाबद्दलच बोलायचय तुमच्याशी आजोबा ...संदीप तुमच्या सवयीचा आहे तो गेले चार दिवस झाले वर्गात रडतोय आजोबाचा गाणं सुद्धा त्याला नकोस वाटायला लागले त्याला तुमची आठवण येते तुमच्या शिवाय तो नाही राहू शकतो तुमच्या घरात काय झाले याला मला काही घेणं देणं नाही तुमच्याही मनात नातवाविषयी प्रेम आहे जीव तुमचाही तळमळतोय मग कशाला विनाकारणात दुरावा?.. आयुष्याची संध्याकाळ सुरेख करायला देवाने आपल्याला दिलेली खेळणी असतात ..सजीव ..त्यांना जीव लावलाय ना तुम्ही अहो पोरगा तुमच्या आठवणीने तळमळतोय नका नका वेगळे राहू  घर तुमचंच आहे ते. काळीज तिथे ठेवून आलात तुम्ही नातवाजवळ.  मग कशाला हा मानभावीपणा आणि अगदी सगळं मुलांचं चुकतं असं गृहीत धरलं तरी लक्षात ठेवा पुढच्या पिढीला मागे येण्याचे गिअर बसवलेला नाही पण आपल्या पिढीला आहे तर दोन पावलं मागे व्हा आणि मनापासून घरात जा सून चांगली आहे तुमची ती माणूस आहे तिलाही समजून घ्या आणि एका जीवासाठी थोडसं नमत घ्या ..तोवर आजोबांच्या डोळ्याला धार लागली होती त्यांनी चष्मा काढला डोळे पुसले आणि म्हणाले.. अहो आम्हाला तरी कुठे करमतय रात्री झोप येत नाही जेवण गोड लागत नाही माझ्यासारखी आमच्या सौ ची पण अवस्था आहे मग मी म्हणाले आजोबा.. मग विचार कसला करताय सांगा बायकोला आपण आपल्या घरी जातोय आपल्या नातवाला आपण तिथे एकटं सोडून आलोय आणि बायकोचा हात धरून सरळ घरी घेऊन यावर आजोबा किंचित हसले आणि म्हणाले हो आता संदीप साठी मला हेच करावे लागणार आहे ...!बहुधा दोन दिवसात हे घडलं दोन-तीन दिवसानंतर संदीप शाळेत आला तेव्हा खुशीत होता आज आजोबा शाळेत सोडून गेले होते आणि आजोबांचं गाणं झालं तेव्हा ते तो जोरदार  म्हणत होता आज संदीप आजोबांच्या चष्म्यावर फुगे फुगे म्हणल्यावर रडत नव्हता कोपऱ्यात जाऊन डोकं खूपसून रडलाही नाही बाईनी इतक्या आनंदाने सांगितलं की जणू काय त्यांचे सासरे त्यांच्या घरी परत आले होते मला ही खूप आनंद झाला संदीप आणि आजोबांची पुनर्भेट झाली पण ही सगळी रुसारूशी  आजोबांच्या गाण्याने उघडी केली बरं ....आज कधी मी आजोबांचं हे गाणं ऐकलं तर मला त्या प्रसंगाची आठवण येते आणि दिसायला लागतात तीन वर्षाच्या संदीपला प्रेमाने खांद्यावर घेऊन जाणारे आजोबा पुढल्या पिढीचे न पेलवणारे तरीही हवे हवेसे वाटणारे प्रेमळ ओझे वाकलेल्या खांद्यावर घेऊन मिरवणारे....! खरं सांगू आजी आजोबा हे आपल्या घरातील विठ्ठल रुक्मिणीचे रूप आहेत संस्काराची पक्की गाठोडी आहेत त्यांच्या गाठी अलगद सोडायच्या प्रेमाने मग सार घर प्रेमात न्हाऊन निघतं.....!!!!


शीला पतकी  सोलापूर 8805850279

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi