कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थानच्या
विकासासाठी आवश्यक कार्यवाही गतीने करावी
- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 27 : नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यामधील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान तीर्थक्षेत्रास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. येथे नवरात्र उत्सवासह वर्षभर देखील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज विधिमंडळातील समिती कक्षात श्री जगदंबा देवस्थान (ता. येवला) तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत बैठक घेतली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, ग्रामविकास विभागाचे सहसचिव काळू वळवी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान येथे नवरात्र उत्सवात विविध भागांतून येणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय असते. भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिसराच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने त्रुटींची पूर्तता करून घेऊन नियोजन विभागाकडे पाठवावा. नाशिकच्या पालकमंत्र्यांनी देखील याबाबतची बैठक घ्यावी, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
०००
No comments:
Post a Comment