Tuesday, 5 March 2024

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस

 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत

९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस

 

            मुंबईदि. ४ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी ३ मार्च रोजी राज्यातील  ० ते ५ वर्षांपर्यंतच्या ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेला आपल्या ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्याबाबत आवाहन केले होते.

            राज्यात एकूण ८९,२९९ बुथ व ट्रान्झिंट टिम २७,५५३ फिरती पथक १५,४३० व रात्रीचे पथक ६४२ याद्वारे ० ते ५ वर्ष वयोगटातील ९५,६४,६१३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे. यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस (आय.पी.पी.आय.) राबविण्यात येणार असून घरोघरी जाऊन सुटलेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

            राज्यस्तरीय सनियंत्रण अधिकारी यांची नेमणूक करुन त्यांच्या मार्फत सर्व जिल्हा व मनपा या मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली व त्यांच्यामार्फत मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात आले. सर्व शासकीय विभागअशासकीय संस्थाजागतिक आरोग्य संस्थायुनिसेफजे. एस.आय.आय.एम. आय. आय. ए.पी. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने मोहीम १०० टक्के यशस्वी होण्यासाठी मदत झाली.

            देशात पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे अंतर्गत सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यांत येत आहे. दिनांक ३ मार्च २०२४ रोजी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राज्यामध्ये राबविण्यात आली.

            या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे. दि. २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारत देश पोलिओ मुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे. पोलिओग्रस्त असणाऱ्या देशांमधून स्थलांतरामुळे देशात पोलिओ रुग्ण आढळण्याच्या धोका उद्भवू शकतो. यासाठी पोलिओ निर्मुलनाकरिता पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे अंमलात आणणे आवश्यक आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi