*संवाद!*
खरंतर मेन्यू कार्डची त्याला
उत्सुकता, प्रतीक्षा असते.
कार्डावर बारकाईनं नजर टाकून
तो वेटरला ऑर्डर देतो…
थोड्या वेळानं तो वेटर खाण्या-पिण्याचे पदार्थ
आणि सोबत एक सुंदर तरुणी घेऊन येतो!
समोरच्या खुर्चीवर ती तरुणी विराजमान होते.
_“हॅव ए गुड टाइम… एन्जॉय!”_
अशा शुभेच्छा देऊन वेटर निघून जातो.
टेबलावर ते दोघंच…
अनोळखी, अपरिचित…
काही क्षण नि:शब्द जातात.
मग दोघंही एकमेकांचा परिचय करून देतात.
या जुजबी ओळखीपाळखीनंतर
तिच्यासाठी कॉफीची ऑर्डर दिली जाते.
दोन अपरिचित व्यक्तींमध्ये सुरू झालेला संवाद
हळुवारपणे रंगत जातो…
उभयतांच्या गप्पांचा फड
चांगलाच रंगलेला असतानाच
वेटर बिल घेऊन येतो…
दोघांचाही हिरमोड होतो
_“पुन्हा भेटू…!”_
म्हणत त्या तरुणीचा निरोप घेऊन
तो हॉटेलबाहेर पडतो!
*‘लिसनर’* नावाच्या शॉर्टफिल्मचं
हे संक्षिप्त कथानक…
जगभर ही फिल्म दाखविली गेली
आणि तितकीच नावाजलीही गेली!
ही शाॅर्टफिल्म बनविण्यामागे संदर्भ होता
अमेरिकेतल्या वॉल्डेन युनिव्हर्सिटीच्या
*'ॲन्युयल रिविव्ह ऑफ सायकॉलॉजी'*
या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख…
*'संवाद हरवलेली कुटुंबं'* हा त्या लेखाचा विषय.
अर्थात, तो अमेरिकेतील एकल कुटुंब व्यवस्थेवर
आणि त्यातही ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक,
आयबीएमसारख्या आयटी कंपन्यात काम करणाऱ्या
कपल्सवर आधारित…
ज्यांच्या मेंदूतून व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक,
इन्स्टाग्रामसारखी सामाजिक संवादी माध्यमं
_(सोशल मीडिया)_ जन्माला आली
तीच माणसं वैयक्तिक आयुष्यात किती
नि:शब्द, निरस आणि एकलकोंडी असतात,
हा त्या लेखाचा निष्कर्ष!
या *'लिसनर’* शॉर्टफिल्मची प्रेरणा घेऊन
कॅलिफोर्नियात, सिलिकॉन व्हॅलीसह युरोपात
अशी हॉटेल्स सुरू झाली आहेत,
जिथं तुम्हाला, तुमचं मन मोकळं करता येतं!
मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागतात!
ते तुमच्यात गुंतत नाहीत;
पण तुम्हाला गुंतवून ठेवतात.
भावनिकदृष्ट्या कसलीही गुंतवणूक नसलेल्या
एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पैसे मोजून
तासभर संवाद साधायला *‘गिऱ्हाईकं’*
येतील की नाही याबाबत
हाॅटेलमालक थोडे साशंक होते…
पण त्यांची शंका क्षणभंगुर ठरली.
बघता-बघता अशा प्रकारची
*‘टॉक-टाइम’ हॉटेल्स* हाऊसफुल्ल झाली!
*संवाद हरवलेली कुटुंबं,*
ही आता जागतिक समस्या बनलीय.
जागतिकीकरणानंतर आर्थिक सुबत्ता आली,
राहणीमान उंचावलं, पण कामाचा ताण,
नोकरीची धास्ती आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी
कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळं
मनस्वास्थ्य हरवून बसलेली माणसं
आपल्या घरात आहेत!
ही केवळ नोकरदार वर्गाची समस्या नाही…
विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध
असे सगळे संवाद हरवून बसलेल्या एक प्रकारच्या
मानसिक आजाराचे शिकार आहेत!
मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताकची राजधानी
*प्राग* इथं नुकत्याच झालेल्या
जागतिक मनोविकार तज्ज्ञांच्या परिषदेत
या विषयावर अतिशय गांभीर्यानं चर्चा झाली…
विशेषत: कोरोना महामारीनंतर
आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या
लक्षणीय वाढीमागे *‘संवादाचा अभाव’*
हे कारण असल्याचं समोर आलंय!
सोशल मीडियावरची गर्दी आणि त्यावर
खर्ची पडणाऱ्या वेळेत झालेली वाढ
हे त्याचं एक प्रमुख लक्षण!
प्रत्येकाला काही तरी सांगायचंय,
पण ऐकणारंच कुणी नाही,
अशा एका विलक्षण कोंडीत जग अडकलंय!
हा कोंडमारा जीवघेणा ठरतोय…
परवा नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं
आत्महत्या केली…
आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेली चिठ्ठी वाचून
आई-वडिलांना धक्काच बसला…
त्यानं लिहिलं होतं,
_'मी गेल्या अनेक दिवसांपासून_
_तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय;_
_पण तुम्ही ऐकूनच घेत नाही._
_माझ्याच घरात जर कुणी ऐकणारं,_
_समजून घेणारं नसेल,_
_तर...तर मी कोणाजवळ मन मोकळं करू?’_
या मुलानं लिहिलेल्या चिठ्ठीतल्या मजकुरानं
आपले डोळे आणि कान उघडले तरी पुरे!
अन्यथा, पैसे देऊन संवाद साधण्याची सोय
उपलब्ध करून देणारी हॉटेल्स
आपल्याकडेही येऊ घातली आहेतच!
*सारांश :*
*बोला, व्यक्त व्हा, संवाद साधा,*
*कुठंतरी मन मोकळं करा...*
No comments:
Post a Comment