Saturday, 10 February 2024

नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे

 नांदेडच्या तख्त सचखंड प्रबंधन कमिटीचे सदस्य शीख समुदायातीलच राहणार

            मुंबई,दि. 9, नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब या गुरुद्वारामध्ये राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे जी व्यवस्थापकीय समिती असेल त्यामध्ये सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.            

            5 फेब्रुवारी, 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दी तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम 2024 अस्तित्वात आणण्यास मान्यता देण्यात आली. या अधिनियमाबाबात काही संस्था व व्यक्ती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पणया अधिनियमातील तरतूदीनुसार व्यवस्थापकीय समितीमधील सर्व सदस्य हे शीख (केशधारी) समुदायातील असणार आहेत. शीख समुदायाचे अधिकारीतज्ज्ञविचारवंत आणि समाजाच्या विविध क्षेत्रात विशेष योगदान असलेल्या व्यक्तींचा या समितीमध्ये समावेश असणार आहे. शीख (केशधारी) समुदायाच्या बाहेरील कोणतीही व्यक्ती या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य असणार नाही.            

            तसेच या समितीच्या अध्यक्ष निवडीबाबतही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष हे शीख (केशधारी) समुदायातीलच असतील. तसेच शीख समुदायाच्या नियमानुसारच या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात येणारी व्यक्ती केशधारी असेल. नवीन समितीमध्ये एकूण 17 सदस्य असतील. त्यामध्ये सदस्य निवडणुकीने निवडले जातील. दोन सदस्य शिरोमणी व्यवस्थापन समिती, अमृतसर यांच्याकडून तर राज्य शासनाद्वारे नियुक्त सदस्यही असतील.            

            या अधिनियमाबाबतचे विधेयक लवकरच विधानसभेमध्ये मांडण्यात येणार असून त्यावर चर्चा झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. तरी या अधिनियमाबाबत पसरवण्यात येत असलेल्या चुकीच्या प्रचारास बळी न पडता शीख समुदायातील नागरिकांनी कोणतीही शंका मनात धरू नयेअसे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi