इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल
मुंबई मध्यवर्ती कारागृहास मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र
मुंबई, दि. ३० :- अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या इट राईट कॅम्पस उपक्रमात मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उत्कृष्ट कामगिरी केली असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी लहू कनसकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त (प्रशासन) चंद्रकांत थोरात, सहा आयुक्त (अन्न) श्री. इंगवले, सहा आयुक्त (औषध) श्री. गव्हाणे आदी उपस्थित होते.
मुंबई मध्यवर्ती कारागृहाने अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्वयंपाक गृहातील उपकरणांची स्वच्छता व देखभाल नोंदी, पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड्स, अन्न पदार्थ हाताळणाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र, ऑडिट, कच्च्या मालाची गुणवत्ता तसेच बनवलेल्या अन्नाची गुणवत्ता व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता या निकषांमध्ये परिपूर्ण कामगिरी केली आहे. इट राईट कॅम्पस उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी करून प्रमाणपत्र मिळवणारे पहिले कारागृह असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यापुढेही मुंबई मध्यवर्ती कारागृहाने उपक्रमात सातत्य राखावे अशी अपेक्षा मंत्री श्री. आत्राम व्यक्त केली.
मंत्री श्री. आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात इट राईट कॅम्पस उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून राज्यातील रुग्णालये, महाविद्यालयाची कॅन्टीन, इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स कॅन्टीन मध्ये चांगली कामगिरी होत असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) श्रीमती अनुपमा पाटील यांनी यावेळी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment