Thursday, 25 January 2024

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष महोत्सवानिमित्त "भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज" या संकल्पनेवर सादर होणार यंदाचा दिल्लीतील चित्ररथ

 ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष महोत्सवानिमित्त

"भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज"

 या संकल्पनेवर सादर होणार यंदाचा दिल्लीतील चित्ररथ

 

            मुंबईदि. २४: नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे.  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान - छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त हौणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही सहभागी होणार आहे.

            सन २०२४ या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली चित्ररथ संचलनात २८ राज्य व सात केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित ‘भारत व भारत लोकशाहीची जननी’ या दोन संकल्पनांवर विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. यास अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३५० वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार श्री शिवराज्याभिषेकाचा ३५० वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून "लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज" या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आले होते. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांचेही चित्ररथाच्या मांडणीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

             छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजही  सर्वांना प्रेरणादायी आहे. महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. नवी दिल्ली येथे साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शविण्यात आलेले आहेत.

            या चित्ररथाची बांधणी राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात करण्यात येत आहे. शुभ ॲड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे.  तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील १६ कलाकार पथकाच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi