Wednesday, 10 January 2024

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत रुग्णालयांत होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती

 वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत रुग्णालयांत

होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती

 

            मुंबईदि. 9 : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये  होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

            मंत्रालयात होमिओपॅथिक महाविद्यालयांच्या विविध समस्या आणि राज्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम काळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक श्री. म्हैसेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये  होमिओपॅथीक विभाग सुरु करण्यासाठी सर्वांगीण अभ्यास केला जाईल. राज्यातील रूग्ण संख्या आणि डॉक्टर यांच्याबद्दल अधिकची माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

            बीएचएमएस अभ्यासक्रमाचा व्यवस्थापन कोटा २५ टक्के व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा ५० टक्के करणे, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे नियमउपनियम व विनियमनास मंजुरी, होमिओपॅथिचे स्वतंत्र संचालनालय सुरु करण्याविषयी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

            बैठकीस असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेसमहाराष्ट्र यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi