मेघालयात २०० वर्षांपूर्वी बांधलेला व्यापारी मार्ग !
- ‘डेव्हिड स्कॉट ट्रेल’ ची रंगत काही औरच...
चेरापुंजीच्या भेटीत दोनशे वर्षांपूर्वीच्या एका माणसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. डेव्हिड स्कॉट हे त्याचे नाव. तो ब्रिटिश काळातल्या बंगालच्या गव्हर्नरचा एजंट. उत्तम प्रशासक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने ब्रिटिशांच्या काळात अनेक महत्त्वाची कामे केली. त्याचा अनेक विषयांचा अभ्यास आणि व्यासंग. तत्वज्ञान, रसायनविज्ञान, भूविज्ञान, खनिजविज्ञान, प्राणिविज्ञान, नॅचरल हिस्टरी, मेकॅनिक्स, सर्व्हे अशा विषयांत त्याला गती. भाषा म्हणाल तर हिंदुस्थानी, फारसी, बंगाली, ईशान्य भारतातील स्थानिक बोली यांचा चांगला परिचय. त्याला निसर्गाचं भलतं वेड. त्यामुळे टेकड्यांवर, जंगलात भटकणे, त्यावर लिहणे, त्यांची टिपणे काढणे हा छंद.
त्याचे एक महत्त्वाचे काम म्हणजे- तेव्हाचा एकत्रित आसाम आणि आता बांगलादेशात असलेले सिल्हेट या दरम्यानचा घोडागाडीचा मार्ग. सुमारे १०० किलोमीटर लांबीचा हा रस्ता. डेव्हिड स्कॉटने तो बांधून घेतला. त्यामुळे व्यापाराच्या वाढीला चालना मिळाली. अर्थातच, यामागे महसुली उत्पन्न वाढवण्याचा मुख्य हेतू होताच. शिवाय सामरिकदृष्ट्याही त्याला महत्त्व होते. पूर्वीचा हा दळणवळणाचा मार्ग आता ऐतिहासिक बनून राहिला आहे.
१८९७ मधे मोठ्या भूकंपामुळे तिथल्या परिसराची हानी, आधुनिक रस्ते या कारणांमुळे आता हा मार्ग व्यापारासाठी वापरात नाही. मात्र, त्याच्यावरून चालणे, ट्रेक / ट्रेल करणे म्हणजे २०० वर्षांच्या काळात रमण्यासारखे आहे. अतिशय निसर्गरम्य असा हा ट्रेल. तिथली पवित्र जंगलं (आपल्याकडील देवराईंसारखी), नितळ प्रवाह, उत्तम जंगल, जैवविविधता आणि अवतीभवतीचे डोंगर... हा ट्रेल काही टप्प्यांमध्ये करता येतो आणि निसर्ग अनुभवत असताना इतिहासही समजून घेता येतो. त्याच्यावरून काही अंतर चालताना तत्कालीन अनेक गोष्टींचा अंदाज येतो आणि त्या काळात रमायला होते. हा ‘डेव्हिड स्कॉट ट्रेल’ या नावानेच ओळखला जातो.
या डेव्हिडचा जन्म स्कॉटलंडमधला, पण वयाच्या ४५ व्या वर्षी मृत्यू इथे चेरापुंजीत झाला. त्याचे स्मारक पाहता येते... या ट्रेलवरून काही अंतर चालणे म्हणजे जुन्या काळात डोकावणेच!
- अभिजित घोरपडे
(मेघालय डायरी ३)
Exclusive Meghalaya - Kaziranga
नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी,
चलो मेघालय
(Feb - March च्या सीमेवर)
9545350862
No comments:
Post a Comment