पालघर जिल्ह्यातील अधिक रकमेच्या वीज देयकांची तपासणी करून
सुधारित बिले देणार
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 8 : पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात काही ठिकाणी अतिरिक्त वीज देयके दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्याठिकाणी सुधारित देयके देऊन ते भरण्यासाठी टप्पे तयार करून देण्यात आले आहेत. अजूनही काही रहिवाश्यांना अतिरिक्त देयके आल्याची तक्रार आल्यास त्यांनाही वीज मीटरचे प्रत्यक्ष फोटो घेऊन सुधारित देयक देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. चुकीचे देयक देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
सदस्य विनोद निकोले यांनी या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मागील वर्षाच्या तुलनेत चुकीची देयके देण्याचे प्रमाण अर्ध्यावर आले असून ते आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जानेवारी 2022 पर्यंत फोटो रिजेक्शनचे 45 टक्क्यांपर्यंत असलेले प्रमाण आता तीन टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. राज्यात स्मार्ट मीटर लावण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वीज वितरण प्रणाली सुधारण्याच्या कामांना गती देण्यात येणार असून वीज चोरी रोखण्यासाठी एबी केबलचा वापर करण्यात येईल. वीज देयक थकित राहिल्याने वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला जातो, त्यानंतर पुन्हा जोडणीची प्रक्रिया सोपी करण्यात येईल, असे सांगून वीज देयके समजण्यास सोपी असावीत याबाबत एमईआरसीला सूचना करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनील भुसारा, राजेश टोपे, ॲड.आशिष जयस्वाल आदींनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment