एम आय डी सी क्षेत्रातील अतिक्रमण
काढण्यासाठी सर्वेक्षण करणार
- मंत्री उदय सामंत
नागपूर दि. 15 : राज्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) क्षेत्रात झालेले अतिक्रमण काढण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
नवी मुंबई येथील ट्रान्स ठाणे क्रीक औद्योगिक क्षेत्रातील शेकडो वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केला. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर, प्रविण दटके यांनी सहभाग घेतला.
यावेळी श्री सामंत म्हणाले, राज्यांतील एम.आय.डी.सी.च्या क्षेत्रात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, तसेच अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या वस्तुस्थितीतून अनधिकृत बांधकामे व अवैध वृक्षतोड बाबतीत सर्वंकष असं धोरण निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे.
राज्यात नवी मुंबई येथील ट्रान्स ठाणे क्रीक औद्योगिक क्षेत्रातील ओपन स्पेस 21 मध्ये शासनाने एक कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल करून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीवर तसेच दोषी अधिकाऱ्यांवर व कंपन्यांवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना ऑक्टोबर 2023 मध्ये दिले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत अतिक्रमण निष्कासनासाठी पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी पोलीस विभागाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. पोलीस बंदोबस्त उपलब्ध होताच या जागेवरील अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment