आक्सापूर ते चिंतलधाबा या रस्ता दुरुस्तीचे
उर्वरित काम वर्षभरात पूर्ण करणार
- मंत्री रवींद्र चव्हाण
नागपूर, दि. ११ : बामणी-राजुरा महामार्गावरील आक्सापूर ते चिंतलधाबा या मार्गाची अतिवृष्टीमुळे झालेल्या दुरावस्थेनंतर या मार्गावर दुरुस्ती करण्यात येत आहे. साडेसहा किलोमीटर लांबीच्या रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असलेल्या रस्त्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिली.
यासंदर्भात सदस्य सुभाष धोटे यांनी प्रश्न विचारला होता.
मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, आक्सापूर ते चिंतलधाबा प्रजिमा- २४ या रस्त्याची एकूण लांबी ७.५ कि.मी. आहे. या रस्त्यावर ६.५ कि.मी. लांबीमध्ये रुंदीकरण व मजबुतीकरण तसेच डांबरीकरणाचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेली रस्त्यांची संबंधित कंत्राटदारांकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिनांक ०४ ऑक्टोबर २०२३ रोजी देण्यात आले असून हे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले
वरोरा-चंद्रपूर-बामणी या राज्यमार्गावरील बल्लारपूर ते बामणी ही १३.८०० कि.मी. लांबीचा रस्ता खासगीकरणांतर्गत प्रकल्पामध्ये समाविष्ट असून, त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे संबंधित कंत्राटदारांकडून करुन घेण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही उपप्रश्न विचारले.
000
No comments:
Post a Comment