Tuesday, 19 December 2023

कोरी वही !"*

 🌹

*"कोरी वही !"*


नविन सुनेचा गृहप्रवेश झाला, सून म्हणाली सासूला

"काय हाक मारु आजपासुन मी तुम्हाला"

सासू संभ्रमात , का हिला असा प्रश्न पडला

वाटलं पटकन म्हणावं , " अगं आईच म्हण मला"

पण हे नातं आहे, कुठला कागद नाही चिकटायला

वेळ द्यावा लागेल नातं आकार घ्यायला 

सावरुन स्वतःला म्हणाली सुनेला 

"मनापासुन जे वाटेल ती साद घाल मला

जे नातं जोडशील ते  निभावून न्यायचंय तुला आणि मला".


नव्यानवलाईचे दिवस सुरु झाले

मुलगा सून संसारात रमले

रोज नविन बेत आखले गेले

कधी नाटक कधी सिनेमे बघितले

रोज नवनवीन पदार्थ होऊ लागले

कधी सासुने कधी सुनेने केले

वर्षाचे सण मजेत साजरे झाले

पण सासुच्या एक लक्षात आले

सुनेने तिला प्रेमाने साद घालायचे टाळले 

मन खट्टू झाले पण वेळीच स्वतःला सावरले

ओठात एक नी पोटात एक, सून नाही अशी आपली 

साद घालेल ती कायमची ही सासुची खात्री पटली


दिवस सरले नवीन पाहुण्याची चाहुल लागली

गोड बातमी सर्वत्र पसरली

सासरी माहेरी कौतुकाला उधाण आले 

सुनेचे मोठ्या प्रेमाने लाडकोड सुरु झाले 

प्रसंगी मुलाला दटावले सुनेला पाठीशी घातले

सासूची लगबग सून डोळे भरुन पाहू लागली

सुनेचं दिवसागणिक बदलतं रूप सासू डोळ्यात साठवू लागली


दिवस काही सरले आणि सुनेने प्रेमाने साद घातली

" साई"

सासू गोंधळली सुनेकडे पाहून विचारती झाली

"मला हाक मारली?"

सून प्रेमाने हसली आणि म्हणाली,

"सासू तुम्ही आहात पण आई माझी झालात

दोन नात्यांची सांगड घालून "साई" म्हणायला केली सुरुवात"

सासू आनंदली सून तिला बिलगली

दोघींच्या मनातली किल्मिषं दूर झाली

मग सासू म्हणाली सुनेला ,"मानलं आहेस मला आई

तर आईसारखं कधी रागवले तर चालेल ना तुला बाई ?"

सून म्हणाली," मानलं आहे तुम्हाला आई

मुली सारखी रुसले तर सावराल ना हो साई ?"

एक नातं आकार घ्यायला लागलं 

सासू-सुनेचं चांगलच सूत जमलं !


दोघींनी मिळून मग निर्णय घेतला काही

घरातल्या पुरूषांना वादात कधी गुंतवायचं नाही

पुरुष याबाबत असतात अलिप्त

मोडू नये त्यांची ही शिस्त

दोघींनी करायची एक एक वही

लिहायचं त्यात सर्व काही

हेवेदावे,रुसवेफुगवे सगळं काही

कैद करायला वापरायची ती वही

आठवड्यातून एकदा करायची वहीची अदलाबदल 

वाचून करायचा त्यानूसार स्वभावात थोडा बदल


वहीत लिहायला सुरुवात केली 

मनातली अढि कमी होत गेली

एकमेकींच्या चुकांची दोघींना गम्मत वाटू लागली

क्षमाशील मनाची नव्याने ओळख पटली


मुलांच्या संसारवेलीवर फुले उमलली

मुलगा सून आता कर्तिसवर्ती झाली

नात्यांची विण आता अधिक घट्ट झाली

तशी दोघींची वही आता कोरीच राहू लागली

वही आता कोरीच राहू लागली !


नविन नात्याच्या उंबरठ्यावर उभी एक आई

येईल ना तिला पण होता कुणाची तरी "साई" ?


साभार

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi