महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी
सर्वपक्षीय महिला आमदारांची समिती
- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. १८ : महानगर पालिका, मुंबई बेस्ट परिवहन उपक्रम तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी काम करतात. अशा महिलांच्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी, त्यांना दर्जेदार सोयी - सुविधा उभारण्यासाठी सर्वपक्षीय पाच महिला आमदारांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचा अहवाल ३० दिवसात बोलाविण्यात येईल. त्यावर शासन आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
मुंबईतील बेस्ट उपक्रमात महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य डॉ. भारती लव्हेकर, यामिनी जाधव, देवयानी फरांदे, यशोमती ठाकूर, मनीषा चौधरी, राम कदम, अजय चौधरी यांनी भाग घेतला.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, बेस्ट उपक्रमात ५ हजार ६४३ चालक असून १८९५ वाहक आहेत. यामध्ये १४३ महिला कर्मचारी आहेत. बेस्ट उपक्रमात २७ आगार व ५७ बस स्थानके आहेत. पुरुषांसाठी ५७ ठिकाणी स्वतंत्र शौचालय असून ३० ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालय आहे. या सर्व शौचालय, स्वच्छता गृहामध्ये दर्जेदार सर्व सोयी - सुविधा महिला कर्मचाऱ्यांसाठी उभारण्याबाबत बेस्ट प्रशासनाला निर्देश देण्यात येतील. या सर्व कंत्राटी महिला कर्मऱ्यांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतन देण्यात येते. याबाबत काही तक्रारी आल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. बेस्ट उपक्रमाला महानगरपालिकेने ६ हजार १२३ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत दिला आहे.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, महिला व बालविकास विभागाचे अर्थसंकल्पीय निधीची तरतूद, झालेला खर्च याबाबत नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील खर्चाचा अहवाल दरवर्षी घेण्यात येईल. महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, स्वच्छता गृहाची व्यवस्था मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर करण्यात येईल.
यावेळी विधानसभा तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी शासनाला महिला आमदारांसाठी नागपूर व मुंबई विधान भवन येथे स्वतंत्र महिला कक्ष, स्वच्छतागृह व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध पुरविण्याच्या सूचना दिल्या.
No comments:
Post a Comment