Saturday, 14 October 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करावी-अजित पवार

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा

खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करावी-अजित पवार

 

पुणे, दि. 14: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी दिले.

 

यावेळी  विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  रमेश चव्हाण,  पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त महेश पाटील, मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावातून धरणात येणाऱ्या अशुद्ध पाण्याबाबत माहिती घेतली. धरण परिसरात असलेल्या गावातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी भूमिगत गटार आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा.  धरण परिसरातील 24 गावातील सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाबाबत पीएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेऊन तात्काळ करावयाच्या उपाययोजनांची रुपरेषा तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 

        कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाच्या सद्यःस्थितीबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. पिसोळी गावापासून रस्ता रुंदीकरणाबाबतही कार्यवाही करावी. शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयीन वेळ लक्षात घेऊन सकाळी आणि संध्याकाळी  2-2 तास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी,असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकाबाबत माहिती घेतली. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रश्नाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

 

00000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi