Saturday, 14 October 2023

नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार

 नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार

 
आमदार भातखळकर यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
 
मुंबई : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असलेला नवरात्रोत्सव हा सण रविवार दि. १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून तसा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आजच प्रशासनाकडून नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२.२० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकसेवेबाबत किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय पुन्हा यानिमित्ताने आला असून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देत असल्याचे आमदार भातखळकर म्हणाले.  
रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारीला वेग आला आहे. या उत्सवात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात. रात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम सुरु असतात. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मेट्रो मार्गिका २ ए म्हणजे अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मार्गिका क्रमांक ७ म्हणजे दहिसर पूर्व ते गुंदवली अशी सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi