Tuesday, 26 September 2023

सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका.* 🌹

 *सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका.* 🌹


एक चित्रकार होता. गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता. गुरू व स्वत:च्या कलेवर त्याला प्रचंड विश्‍वास होता. पण स्वत:वर त्याचा विश्‍वास फारसा नसावा. तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’ हा प्रश्‍न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला.


एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली, मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले? यात कुठेही चूक वाटली तर त्याजागी एक छोटीशी फुल्ली मारा.’ लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला. संपूर्ण चित्र फुल्ल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते.


चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हरलो. मी खूप वाईट चित्रकार आहे. मी चित्रकला सोडायला हवी. मी संपलो.’ हे ऐकून गुरूने म्हटले, ‘तू व्यर्थ नाहीस. तू फार चांगला चित्रकार आहेस. मी ते सिद्ध करू शकतो. असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये. तसेच चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरूकडे आला.


गुरू त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली, ‘मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा.’ ही पाटी लावून ते दोघे निघाले.


संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हातदेखील लावला नव्हता. सहा-आठ दिवस ते चित्र तसेच राहिले. यावर गुरू म्हणाले, ‘फुल्ल्या मारणे सोपे असते, पण दुरुस्ती करणे कठीण असते.’


दुनियेच्या कोर्टात स्वत:ला उभे करू नका.


सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटू नका. मी कोण आणि कसा हे पहिल्यांदा स्वत:ला विचारा.🙏🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi