Monday, 18 September 2023

महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय

 महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय


काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, 'सरहद'च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


श्रीनगरमध्ये ' हम सब एक है' विशेष कार्यक्रम


            श्रीनगर, दि.18 :- महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मिरच्या तरुणांसाठी 'सरहद' संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल येथे सांगितले.


            पुणे येथील 'सरहद' संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या 'हम सब एक है' या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, सरहद संस्थेचे संजय नहार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमरनाथ यात्रा तसेच कोविड काळात सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील 73 नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या नागरिकांना ‘वन इंडिया रिंग’ने सन्मानित करण्यात आले.


            काश्मिरशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दृढ ॠणानुबंध होते, याचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू होत आहे. सरहद या संस्थेच्या माध्यमातून आपले जुने नाते आणखी मजबूत करण्याचा हा उपक्रम आहे. 'सरहद' संस्थेने मानवतेच्या क्षेत्रात आगळे काम केले आहे. संस्था आपत्कालीन आणि अगदी कोविडच्या संकटात धावून आली आहे. संस्थेच्या माध्यमातून पुण्यात काश्मिरी तरुणांसाठी मोठे काम उभे केले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या शिक्षणातील आरक्षणासाठी वंदनीय बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता. ज्या- ज्यावेळी काश्मिरला आलो त्यावेळी येथील बांधवानी आपल्यावर भरभरून प्रेम केल्याचे सांगून, मुख्यमंत्र्यांनी आपण सदैव काश्मिरी बांधवांच्या प्रगतीसाठी सज्ज राहणार असल्याचा पुनरुच्चार केला.


काश्मिरला निसर्गाचे अपूर्व वरदान लाभले आहे. महाराष्ट्र आणि काश्मिर दोन्ही राज्यांत पर्यटनाच्या अमर्याद संधी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


            पनवेल येथे काश्मिरी नागरिकांसाठी दिलेल्या जमिनीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली. तसेच काश्मिरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'नमो 11 कलमी’ कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच जी-20 च्या निमित्ताने भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले व यात काश्मिरसह अनेक राज्यांना आपले वेगळेपण सिद्ध करण्याची संधी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे ते म्हणाले.


ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन - मनोज सिन्हा


            काश्मिरमध्ये महाराष्ट्रभवन उभारण्याच्या मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या प्रस्तावाला नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी मुख्यमंत्री श्री‌. शिंदे यांना तत्काळ प्रतिसाद दिला. आपण येत्या नवरात्रोत्सवात काश्मीर दौऱ्यावर याल त्यावेळी या महाराष्ट्र भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन केले जाईल. त्यासाठी आपल्याला जाहीर निमंत्रण देत असल्याचे त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमात सुरवातीला, अनंतनाग येथे चकमकीत शहीद झालेल्या लष्करी तसेच पोलीस अधिकारी, जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi