Friday, 1 September 2023

मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी

 मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचेही निर्देश


          मुंबई, दि. १ : ‘मुंबईतील केवळ प्रमुख रस्तेच नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय.एस. चहल यांना दिले.


          ‘मुंबईतील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. ही बाब मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभिर्याने घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी आयुक्त श्री. चहल यांना सांगितले आहे.


          माझगाव डॉक येथील कार्यक्रमाहून परतत असताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना या परिसरात काही ठिकाणी राडारोडा, अस्वच्छता, कचरा आढळला. त्याची दखल घेत, तेथूनच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आयुक्त डॉ. चहल यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला. तसेच या परिसरातीलच नव्हे, तर मुंबईतील सर्व रस्ते, गल्लीबोळ, छोटे रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये, याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरित हटवा. यासाठी पालिकेचे सर्व सहायक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, स्वच्छता निरीक्षक- स्वच्छता कर्मचारी अशा सर्व यंत्रणांना कामाला लावा. शहरातील ज्या-ज्या ठिकाणी भिंतींचे सुशोभीकरण करण्याचे काम अपूर्ण आहे, ते त्वरित पूर्ण करा,’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.


          माझगाव डॉक परिसरातील अस्वच्छता प्रकरणी तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच येत्या सात दिवसांमध्ये मुंबईतील सर्व वॉर्ड आणि त्यांचा परिसर, सर्व समुद्रकिनारे यांची स्वच्छता युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल, असे आयुक्त डॉ. चहल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi