पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार
घरच्या गणेशमूर्तीचे केले कृत्रिम तलावात विसर्जन
ठाणे दि. 21 :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी स्वत: कृतीशील पुढाकार घेतला. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन मुख्यमंत्र्यांनी काल (20 सप्टेंबर 2023) रोजी कृत्रिम तलावात केले. त्यांच्या या पर्यावरणपूरक कृतीचे ठाणेकरांनीही मोठ्या प्रमाणात अनुकरण केले.
महानगरपालिका क्षेत्रात दीड दिवसाच्या १३ हजार ९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या पर्यायी गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्थेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २०२ गणेश मूर्तींचे तसेच ११ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर व अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेंतर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १५ कृत्रिम तलावांची व्यवस्था महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली आहे, तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मीठबंदर, कळवा, गायमुख आदी सात ठिकाणी विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४२ ठिकाणी विसर्जनासाठी विशेष टाकी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा व तेथे विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींची संख्या पुढीलप्रमाणे - विसर्जन घाट (०७) - ११ हजार ९१० गणेश मूर्ती, कृत्रिम तलाव (१५) - ९६८ गणेश मूर्ती, विशेष टाकी व्यवस्था (४२) - १ हजार ७७ गणेश मूर्ती, अशा एकूण १३ हजार ९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment