Monday, 25 September 2023

आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत


नेमबाजीत सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन


ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी


           


            मुंबई, दि. 25 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंह पनवर, ऐश्वर्यसिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे.


            चीनमध्ये फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरुवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करत, संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. रुद्रांक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू आहे. त्याच्या नेमबाजीतील नैपुण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाठबळ दिले आहे. 


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या तिघांचेही विशेष कौतुक करीत म्हटले आहे की, भारताने नेहमीच आशियाई क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे. यंदाच्या या स्पर्धेत सुरुवातच या तिघांनी नेमबाजीत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन केली आहे. यासाठी या खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षक-मार्गदर्शकांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुबीयांचे देखील कौतुक करावे लागेल. अशा जिद्दी आणि मेहनती खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावरच भारताची यंदाच्या या स्पर्धेतील कामागिरी अशीच दिमाखदार राहील आणि आपला भारत या स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या यशस्व‍ितेसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंच्या पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत

.


0000



 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi