Thursday, 21 September 2023

जळगाव जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कमदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी

 जळगाव जिल्ह्यातील पीक विम्याची अग्रीम रक्कमदिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी


- कृषीमंत्री धनंजय मुंडे


 


            मुंबई दि. 21 : जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.


            पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यात सन 2022 - 23 या वर्षातील केळी व इतर खरीप पिकांच्या पीक विम्याबाबत मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुंडे बोलत होते. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते


            पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 2022-23 या वर्षांमध्ये 77,860 शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज दाखल केले होते त्यामधून 81,510 हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. त्यापैकी केवळ 46 हजार 949 अर्जांची तपासणी करण्यात आली होती. तसेच या कालावधीतील पीक परिस्थितीचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मागवून घेऊन फेर पडताळणी करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचे निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.


            यावेळी मंत्री श्री. पाटील व मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात पावसाने 21 दिवसांपेक्षा अधिक खंड दिला असल्याने पीक विम्याची 25 टक्के रक्कम अग्रीम देण्याची मागणी केली. यावर कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून दसरा ते दिवाळी दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम रक्कम जमा होईल, असे सांगितले.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi