सरलांबे येथील दुर्घटनेचा पोलीस तपास सुरू ;
मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना शासनाची मदत जाहीर
- मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 2 : इगतपुरी ते मुंबई दरम्यान सुरू असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे लाँचर कोसळून झालेल्या दुर्घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना शासनाने मदत जाहीर केली असून जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मंत्री श्री.भुसे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे पाच लाख रूपये, जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्र शासनाने देखील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त मूळ कंत्राटदार यांच्याकडून पाच लाख रुपये तर उप कंत्राटदार यांच्याकडून पाच लाख रुपये मदत दिली जाणार असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे 701 किमी पैकी 600 कि.मी.चे काम पूर्ण झालेले असून हा महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. उर्वरित नाशिक व ठाणे जिल्ह्यातील 101 किमीचे काम प्रगतीपथावर आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे सुमारे 2.28 किमी लांबीच्या व्हायडक्ट पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. संपूर्ण जगात अशा तीन ते चारच कंपन्या आहेत. या कंपनीचे स्वयंचलित लाँचर वापरण्यात येत असून याचे वजन 700 मे.टन इतके आहे. या स्वयंचलित लाँचरमार्फत एकूण 114 गाळ्यांपैकी 98 गाळ्यांचे बांधकाम या कंपनीने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
दिनांक 31 जुलै 2023 रोजी रात्री 11.30 वाजता लॉचिंग गर्डर दुसऱ्या दिवसाची पूर्वतयारी करण्यासाठी गेले असता क्रेन (सेगमेंट लाँचर) पूर्ण झालेल्या गर्डरसह 35 मीटर उंचीवरून पियर क्र. 15-16 मध्ये अचानक कोसळली. या ठिकाणी सुमारे 17 कामगार, चार अभियंते व सात कर्मचारी असे एकूण 28 जण दुसऱ्या दिवसाची पूर्वतयारी करण्यासाठी गेले होते. त्यापैकी या दुर्घटनेत 13 कामगार, दोन अभियंते व पाच कर्मचारी असा एकूण 20 जणांचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना ज्युपिटर रुग्णालय, ठाणे येथे तर एकास शहापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पाच जण सुरक्षित आहेत. मृत्यू पावलेल्यांपैकी उत्तर प्रदेश येथील आठ, बिहार येथील पाच, पश्चिम बंगाल येथील चार, तामिळनाडू येथील दोन तर उत्तराखंड राज्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. या दुर्घटनेचे विश्लेषण या क्षेत्रातील तांत्रिक तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या घटनेसंदर्भात शहापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी निवेदनाद्वारे दिली.
00000
No comments:
Post a Comment