Sunday, 27 August 2023

जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता

 जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता


                                                     - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


        मुंबई दि.26 : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून जपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. 


            आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी, प्रांतांचे गव्हर्नर, कंपन्या, एंजन्सी यांच्यासोबत आपण सविस्तर बैठका केल्या असून जपानच्या काही कंपन्या शिष्टमंडळासह भारतात चर्चेला येऊ इच्छितात.


            नवीन भारताच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास त्यांनी दाखविला आहे. त्यातील मोठा वाटा महाराष्ट्रात यावा, असा आपला प्रयत्न राहील. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने एक विशेष चमू आम्ही तयार करणार आहोत. जपानी भाषा बोलता येणारे लोक त्यात असतील. डेटा सेंटर्स ते सेमी कंडक्टर, अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आणण्यात येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 


वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो 11, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जपानची मदत


राज्यात आपण वर्सोवा-विरार सीलिंक तयार करतो आहे, त्यासाठी मदत करण्यास जपान सरकारने सकारात्मकता दाखविली आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळताच त्यादृष्टीने पुढची पाऊले टाकली जातील. मेट्रो 11, मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पाला सुद्धा मदत करण्याची तयारी जपानने दर्शविली आहे.


एनटीटी आणि सोनी यासारख्या व इतर कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. जपानमधील मोठमोठे उद्योग भारतात येऊ इच्छितात. या सर्व उद्योगांना सहकार्य करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. तसेच जायका, जेट्रो, जेरा यासारख्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळवून राज्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.


मला दिलेली मानद डॉक्टरेट हा महाराष्ट्राचा सन्मान


            चांद्रयान मोहिमेच्या लँडिंगसाठी मराठी बांधव मोठ्या संख्येने जपानमध्ये एकत्रित जमले होते. त्यांच्यासोबत बसून मला हा सोहोळा पाहता आला, याचा मला अतिशय आनंद झाला. जणू भारत तेथे साकारला होता, अशी आठवण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. कोयासन विद्यापीठाने मला मानद डॉक्टरेट दिली, याचा खूप आनंद झाला, हा माझा नाही, तर महाराष्ट्राचा सन्मान आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


0000



 


 


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi