रानकवी' ना. धों. महानोर यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले
- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 3 : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक व माजी आमदार ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ना. धों. महानोर यांनी आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांचे साहित्य व काव्य हे वास्तवदर्शी व हृदयाला भिडणारे होते. त्यांची अनेक गीते लोकांच्या मनात आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्याने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारा एक थोर कवी व साहित्यिक गमावला आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
000
Governor Bais condoles demise of 'Ran Kavi' N D Mahanor
Mumbai, 3 : Maharashtra Governor Ramesh Bais has expressed grief over the demise of Marathi poet and writer N. D. Mahanor. In a condolence message, the Governor wrote:
"The works of poet, lyricist and writer N. D. Mahanor reflected the life and aspirations of the common man. His writing and poetry was realistic and touched the core of the heart. Many of his lyrics are fresh in the memory of the people. In his demise the State has lost a respected poet and writer who enriched the world of Marathi literature."
0000
वृत्त क्र. 2595
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर
यांना श्रद्धांजली, मराठी मातीतला 'रानकवी' हरपला
मुंबई, दि.3 :- “मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
“मराठी माती सर्जनशीलतेची खाण आहे. यात ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने निसर्गाची, राना- वनातील, पानाफुलांतील सौंदर्याची अनेकविध रूपे रसिकांसमोर मांडली. ते प्रयोगशील शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची मांडणी करताना त्यांनी ग्रामीण जीवनाच्या अनेक पैलूंवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. शेतातून, साहित्यिक मंच ते विधानपरिषद असा त्यांचा प्रवास राहिला. या सगळ्याच ठिकाणी महानोर यांनी आपल्या संवेदनशील कवी मनाची अमीट छाप उमटवली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ साहित्यिक, कवी माजी आमदार ना. धों.महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
0000
वृत्त क्र. 2594
रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 3 : “ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने रसिक मनाचे रानाशी मैत्र घडवून देणारा कवी हरपला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेणारा महान साहित्यिक आपण गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, “ना. धों. महानोर यांनी कवितेला हिरवा शालू नेसवला. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या कवितासंग्रहाने मराठी माणसावर गारूड केलं. लोकसाहित्यावर त्यांनी अलोट प्रेम केल. त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेली गीते मनाचा ठाव घेणारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक थोर साहित्यिक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !”
0000
वृत्त क्र. 2593
मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा 'रानकवी' हरपला
-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 3 :- "ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं 'रानकवी' होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां'नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी' सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केलं. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे नेत त्यांनी साहित्यक्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलं. निसर्गकवी म्हणून वावरताना निसर्गाची काळजीही घेतली. पाणलोट पर्यावरण क्षेत्रातल्या कार्याबद्दल ते 'वनश्री' पुरस्काराने सन्मानित होते. राज्य शासनाच्या ‘कृषीभूषण’, केंद्र सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराचे मानकरी ठरले होते. शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पवार कुटुंबीयांनी घनिष्ठ मित्र गमावला आहे. महानोर कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. ना. धों. महानोर साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवीवर्य ना. धों. महानोर यां
च्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.
००००
No comments:
Post a Comment