डांगुर्ली बॅरेज प्रकल्पाला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येणार
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 2 : डांगुर्ली बॅरेज हा केवळ सिंचन प्रकल्प नसून या प्रकल्पामुळे पिण्याचे पाणीसुद्धा मिळणार आहे. या प्रकल्पाला विशेषबाब म्हणून मान्यता देण्यात येणार असून याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य विनोद अग्रवाल यांनी गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, डांगुर्ली बॅरेज प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती यांच्या मान्यतेने शासनास प्राप्त झाला असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे. तेढवा शिवनी, देवरी नवेगाव, राजेगाव काटी या तिन्ही उपसा सिंचन योजना या वैनगंगा नदी व बाघ नदीवरील वाहत्या पाण्यावर संकल्पित करण्यात आलेल्या असून जून ते डिसेंबर या कालावधीमध्ये नदीपात्रात पुरेसे पाणी उपलब्ध होत असल्याने त्याचा वापर सिंचनासाठी करण्यात येतो. परंतू डिसेंबर नंतर नदीपात्रात पुरेसे पाणी नसल्यामुळे जानेवारी ते मे या कालावधीमध्ये सिंचनासाठी पाणी देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. ही अडचण दूर करण्यासाठी वैनगंगा नदीवर तेढवा शिवनी व देवरी नवेगाव उपसा सिंचन योजनांच्या खालील बाजूस डांगुर्ली बॅरेज आणि बाघ नदीवर राजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या खालील बाजूस तीन मीटर उंचीचा बंधारा प्रस्तावित करण्यात आलेला आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
****
No comments:
Post a Comment