Tuesday, 29 August 2023

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान

 राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान


महाराष्ट्राने २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा


- राज्यपाल रमेश बैस


ऑलिम्पिकमध्ये यश मिळावे यासाठी खेळाडूंना सर्व सहकार्य;पुरस्कार रकमेत वाढ


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


          पुणे दि. २८ : भारत २०३६ चे यजमानपद भूषविण्याच्यादृष्टीने पूर्वतयारी करीत असून राज्यानेही प्रत्येक क्रीडा प्रकारातील आपली बलस्थाने आणि कमकुवत दुवे ओळखून या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.


          शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.


          राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, ऑलिम्पिक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. क्रीडातज्ज्ञ आणि खेळाडूंच्या सहकार्याने आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजना तयारी करण्यात यावी. शालेयस्तरावरील विविध स्पर्धांच्या आयोजनात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यावरही भर द्यावा लागेल.


          महाराष्ट्र हे क्रीडा धोरण बनविणारे पहिले राज्य आहे. आजही देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात राज्याचा दबदबा आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीयस्तरावर चांगली कामगिरी केली असली, तरी आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्तम सामुहिक कामगिरीसाठी अधिक तयारी करण्याची गरज आहे. विशेषत: स्थानिक खेळांकडेही लक्ष द्यावे लागेल, असे सांगतानाच राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.


          समर्पित प्रशिक्षक आणि निवृत्त खेळाडू ही आपली खरी शक्ती आहे. खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी त्यांचे सहकार्य आणि पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग करून घ्यायला हवा. ‘मिशन लक्ष्यवेध’च्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खेळाडूंची महत्वाकांक्षा, निष्ठा आणि संकल्प त्यांना अडचणीतून मार्ग काढत यशाला गवसणी घालण्यात मदत करेल, असेही श्री.बैस म्हणाले.


ऑलिम्पिकमध्ये यश मिळावे यासाठी खेळाडूंना सर्व सहकार्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


          पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारे देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले आहे. चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत ५६ सुवर्णपदकांसह एकूण १६१ पदके मिळवून तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३९ पदकांसह १४० पदके मिळवून अव्वल कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या खेळाडूंनी यश मिळवले. ऑलिम्पिकमध्येही चांगले यश मिळावे यासाठी सर्व सहकार्य करू. खेळाडूंनी राज्याचा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर असाच उंचवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.


१५ जानेवारी आता राज्य क्रीडा दिन


          मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा दिवस महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केला.


पुरस्कारांच्या रकमेत वाढ; आजच्या पुरस्कारार्थ्यांनाही लाभ


          क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा नितांत आदर राज्य सरकारला आहे. त्यांच्या कार्यातून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असे सांगून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना पाच लाख रुपये आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना तीन लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. आज दिलेल्या पुरस्कार विजेत्यांनाही वाढीव पुरस्कार रक्कम देण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले.


क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात राज्य शासन अग्रेसर - अजित पवार


          उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन अग्रेसर आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी देण्यात आलेल्या पुरस्काराच्या रकमेत १ लाख रूपयाऐवजी ३ लाख आणि ३ लाख रूपयाऐवजी ५ लाख रुपये अशी वाढ करण्यासाठी लागणाऱ्या २ कोटी ३८ लाख रुपयांच्या रकमेस मान्यता देण्यात येईल. 


          भालाफेकमध्ये गेल्या वर्षी रौप्यपदक आणि यावर्षी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचे आणि पुरस्कारार्थीचे अभिनंदन करून श्री.पवार म्हणाले की, खेळाडूंना घडविण्यात त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षकाचे फार मोठे योगदान आहेत. भविष्यात अशीच अनेक पदके मिळाविण्याचा खेळाडूंनी प्रयत्न करावा. शासनाकडून नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जाईल.


युवा खेळाडूंनी पुरस्कार विजेत्यांचा आदर्श घ्यावा - गिरीश महाजन


          ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले की, खेळाडूंच्या मागणीचा विचार करुन त्यांना आवश्यक क्रीडा सुविधा आणि स्पर्धांना जाण्यासाठी विमान प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळामध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत वाढ केली, अनेक निर्णय राज्य शासनाने घेतले. यापुढेही खेळाडूंना लागणाऱ्या आवश्यक त्या सोयी-सुविधा क्रीडा विभागाच्यावतीने देण्यात येतील.


क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी मिशन 'मिशन लक्ष्यवेध'- संजय बनसोडे


          क्रीडा मंत्री श्री.बनसोडे म्हणाले, राज्यात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. खेळाडूंना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन लक्षवेध’ योजनेंतर्गत स्पोर्ट्स सायन्स सेंटर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. क्रीडा विद्यापीठासाठी देखील कुलगुरुंची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे.


पारंपरिक क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी प्रो- कबड्डी


          लीग स्पर्धेच्या धर्तीवर यावर्षी मुंबईत प्रो- गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी ५० हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून विम्याच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.


          प्रास्ताविकात श्री.दिवसे यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांविषयी माहिती दिली. बुंदेसलिगा या जागतिक क्रीडा संघटनेसोबत करार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


          राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. एकूण ११९ खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीकांत शरदचंद्र वाड यांना सन २०१९-२० या वर्षाचा, तर दिलीप बळवंत वेंगसरकर यांना सन २०२०-२१ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा 

जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.


0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi