Monday, 7 August 2023

नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही,एसटी, खासगी बस प्रवाशांच्या सेवेत

 नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही,एसटी, खासगी बस प्रवाशांच्या सेवेत


- मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा


 


            मुंबई, दि. 7 : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.


            बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री लोढा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल उपस्थित होते.


            मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले की, मुंबईत ३०५२ बस नागरिकांच्या सेवेसाठी आहेत. त्यापैकी १,३८१ बस बेस्टच्या असून त्या सुरू आहेत. खासगी कंपन्यांद्वारे उर्वरित १,६७१ बस (वेट लीजवर) कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येतात. जास्तीत जास्त बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेस्टकडून ९०० वाहनचालक दिले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहनने (एमएसआरटीसीने) १८० पेक्षा अधिक बस दिल्या आहेत. तसेच, २०० पेक्षा जास्त खासगी बस सुरू करण्यात आल्या आहेत. अशा एकूण ३०५२ बसपैकी २६५१ बस नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्यक्षात सुरू असून, उर्वरित ४०० बस तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे.


            खासगी कंपन्यानी बस वाहन चालकांच्या किमान वेतनाची शाश्वती द्यावी, त्यांना आवश्यक सोयी सुविधा द्याव्यात, दिवाळी बोनस संदर्भातील प्रश्न सोडविण्यासंदर्भात कंपन्यांच्या मालकांसोबत चर्चा करण्यात आली असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.


०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi