Thursday, 24 August 2023

चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅण्डिगबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे

 चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅण्डिगबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन


 


            मुंबई, दि. 23 : जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्व‍ितेबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन केले असून हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. भारताच्या अंतराळातील पुढील सर्व मोहिमांना चांद्रयान-3 मोहिमेमुळे बळ मिळाले आहे. भारत जगातील एक महत्त्वाचा देश बनला असून आगामी काळात जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास येत आहे.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, चांद्रयान-3 मोहीम भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेतून चंद्राचे अनेक रहस्य उलगडले जातील. आगामी काळात भारत चंद्रावर नक्की मानव उतरवेल. भारतीय शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण मोहीम पूर्ण केली आहे. भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारतीय नागरिक, शास्रज्ञ, तंत्रज्ञ या सर्वांचे मी अभिनंदन करतो. याबरोबरच मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर या शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे, त्यांचाही अभिमान वाटतो. या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार झालो याबद्दल जगभरातील भारतीयांचे अभिनंदन.


००००



 


वृत्त क्र. 2850


भारतीयांची मान उंचावणारा दिवस


- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा


 


 


            मुंबई, दि. २३ : भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे ‘चांद्रयान ३’ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता! भारतीयांनी देखील एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. राज्यात सुद्धा विविध ठिकाणी नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी ‘चांद्रयान ३’ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पालकमंत्री श्री. लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातील वसंतराव नाईक चौक गार्डन ताडदेव सर्कल, मलबार हिल येथे झाला.


            "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व, त्यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांवर दाखवलेला दृढ विश्वास आणि या मोहिमेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्वच लोकांमुळे आज १४० कोटी भारतीयांची मान उंचावणारा क्षण आहे. चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचा क्षण अनुभवताना प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आला असणार हे नक्की आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी म्हटले आहे.


****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi