Wednesday, 26 July 2023

वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजनेतीललोकसंख्येचा निकष बदलण्यासंदर्भात लवकरच बैठक

 वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजनेतीललोकसंख्येचा निकष बदलण्यासंदर्भात लवकरच बैठक


- मंत्री अतुल सावे


            मुंबई, दि. 25 : वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजनेतील लोकसंख्येचा निकष बदलण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने या अधिवेशनाच्या कालावधीत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य योगेश कदम यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सावे यांनी उत्तर दिले.


            ते म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या तांडे/ वाडी/ वस्त्यांना प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर सन २००३-०४ या वित्तीय वर्षांपासून "वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आली आहे.


            या योजनेंतर्गत पंचवार्षिक आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामांचा प्राधान्यक्रम व निकड विचारात घेऊन विकास कामांची निवड केली जाते. तांडा/ वस्त्यांच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेंतर्गत तांडा / वस्तीमध्ये विद्युतीकरण (हायमेक्स, पथदिवे, एलईडी बसविणे), पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालये तसेच समाज मंदिर/वाचनालये व शक्य असेल तेथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे, सभागृह / समाजमंदिर या पायाभूत सुविधांची कामे करण्यात येतात. मात्र, या कामामध्ये लोकसंख्येचा निकष ही अडचण असेल, तर ती बदलण्याच्या अनुषंगाने बैठक घेऊन प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री श्री. सावे यांनी यावेळी दिली.


            सदस्य नितेश राणे, रोहित पवार यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi