प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनीपर्यावरणपूरक सण साजरे करावेत
- मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. २५ : नागरिकांनी पर्यावरणपूरक सण साजरे करून, प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचे जलस्रोतांमध्ये विसर्जन करू नये याबाबत महानगरपालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, सार्वजनिक सणांच्या वेळी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पर्यावरणविषयक विविध कायदे व त्या कायद्यांची अंमलबजावणी व्यापक जनहितार्थ असून त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.
महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांसाठी प्राधान्य तत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी व त्याचबरोबर त्यांना काही प्रमाणात शाडूची माती उपलब्ध करून देता येईल का याची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत, असेही मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.
या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.
****
No comments:
Post a Comment